मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी करण्यात येत आहे. रोहित पवार यांची याआधी देखील चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा रोहित पवारांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार ते आज पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले.
रोहित पवार यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात गर्दी केली. या कार्यकर्त्यांनी ईडीच्या या कारवाईविरोधात प्रदेश कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं. यावेळी रोहित पवारांनी त्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली.
रोहित पवारांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना सांगितले, मी व्यवसायात कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही. मी आधी व्यवसायात आलो नंतर राजकारणात आलो आहे. अशी अनेक लोक आहेत की जे पहिल्यांदा राजकारणात आले आहेत. नंतर व्यवसायात आले आहेत. पण त्यांना कोणतीही अडचण आलेली नाही. मी व्यवसाय करत असताना अनेक अडचणी आल्यात तेव्हा देखील मी संघर्ष केला आहे आणि आज राजकारणात आल्यानंतर संघर्ष करत आहे. येथून पुढेही मला संघर्ष करावा लागणार आहे.