छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले असून छत्रपती संभाजीनगरात आणि मराठवाड्यातील प्रमुख शहरात एनआयएच्या पथकाने एंट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कबर काढण्याच्या चर्चा सुरू असतानाच नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. एका समाजाची घरे दुस-या समाजातील लोकांनी मुद्दामहून लक्ष्य केल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये पोलिसांसह काही नागरीक जखमी झाले आहेत. दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असला तरी या घटनेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यातच संवेदनशील भागावर अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. एटीएस अधिका-यांची मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली, ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे. त्या जिल्ह्यातल्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या लेण्या त्याचबरोबर घृष्णेश्वर मंदिर आणि लगतचा असलेला दौलताबाद किल्ला याठिकाणी पर्यटकांची संख्या ही मागील काही दिवसांपासून याच प्रकरणामुळे कमी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यात एकीकडे हा वाद सुरू असला तरी दुसरीकडे मात्र खुलताबाद मध्ये शांततेच वातावरण आहे. संचारबंदी असलेल्या महाल, भालदारपुरा, हंसापुरी, मोमीनपुरा भागात आज चौथ्या दिवशीही चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे. तर पोलीस आयुक्तांनी कालपासून ११ पैकी नऊ भागातील संचारबंदी शिथिल केली आहे.
इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलिस आयुक्त आढावा घेणार आहेत. कालपासून नंदनवन आणि कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णत: उठवण्यात आली आहे. तर शांतीनगर, पाचपावली, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या भागात दैनंदिन जीवनात लोकांच जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी शिथिलता देण्यात आली. या भागात कालपासून पासून दुपारी दोन ते चारपर्यंत दोन तासांकरिता शिथिलता देण्यात आली आहे.
संशयिताच्या हालचालीवर बारीक लक्ष
औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपूरात हिंसाचार झाला. मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे.
नागपूरात संचारबंदी कायम
नागपूरात हिंसाचार घडलेल्या परिमंडळ ३ मधील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ येथील संचारबंदीचा आजचा पाचवा दिवस आहे. कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत अद्यापंही तणावपूर्ण शांतता आहे. या तीन पोलिस स्टेशन हद्दीतील बाजारपेठ, शाळा आणि परिवहनाची साधणे बंद असतील.