लातूर : येथील प्रकाशनगरमधील प्रबोधन मध्ये दि. ५ जानेवारी रोजी मुक्ता साळवे यांच्या १८२ व्या जयंती निमीत्त लसाकम संलग्न असलेल्या मुक्ता साळवे महिला परिषदेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. श्रीमती दिपिका दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बोलताना श्रीमती अन्नपूर्ण नामवाड, श्रीमती रेखाताई दुवे, श्रीमती वैशालीताई रणदिवे यांनी मुक्ता साळवे यांचे जीवन, कार्य आणि विचार सांगताना विद्यार्थी जीवनातच मुक्ताने १८५३ साली महार-मांगांचा धर्म कोणता? असा सवाल वर्णाधिष्टीत-जातीनिष्ठ मनुवादी धर्मासमोर उपस्थित केला होता.
भारतात अस्पृश्य ठरविण्यात आलेला दलित समाज वर्णबा समाज असून त्यांचा हिंदु धर्माचा कसलाही संबंध नसल्याचे मुक्ता साळवे यांनी निक्षुन आणि स्पष्टपणे सांगीतले होते. उच्चवर्णीयांची सेवा करण्यासाठी दलितांना गुलाम करुन त्यांचे हजारो वर्षे शोषण केले. ते आजही चालू आहे.त्यामुळे आजच्या दलितांनी हिंदुत्वाचे जोखड फेकून देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस क्रांतीज्योती मुक्ताई साळवे यांच्या प्रतिमेला पुषाहार घालून अभिवादन करण्यात आले. श्रीमती अनुसया हजारे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती निर्मलाताई सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती आश्विनीताई कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास श्रीमती लक्ष्मीताई घोडके, शितलताई अडागळे, वैशालीताई घोडके, संजीवनी घोडके, जिजाबाई घोडके, कु. मुग्धा दुवे, कु. मयुरा, अंकिता, श्रेया, अंश, अद्वैत आणि आर्णव आदिजन आवर्जुन उपस्थित होते.