नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी शाहनवाज आलम या दहशतवाद्याला अटक केली होती, त्याची सध्या चौकशी सुरु आहे. पण या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. इसिसकडून गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी गुजरातमधील विविध धार्मिक स्थळे इसिसच्या टार्गेटवर होती. अनेक बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
शाहनवाजनं पोलिसांना सांगितलं की, इसिसचा हँडलर अबु सुलेमान याच्या सांगण्यावर दोन दहशतवाद्यांनी अहमदाबाद, वडोदरा आणि सुरतला घेराव घालण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी गुजरातचे प्रामुख्याने टार्गेट करण्यात आले होते. शाहनवाजला गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीस होते.
चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी सांगितले की, इसिसचे दहशतवादी ट्रेनने अहमदाबादेत पोहोचले आणि इथे ते दोन दिवस थांबले. पहिल्या दिवशी त्यांनी रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, विद्यापीठ, व्हीआयपी मार्ग, अटल पूल, गर्दीच्या बाजाराच्या ठिकाणांचे देखील निरिक्षण केले. त्याचबरोबर बोहरा मुस्लिम समुदयाच्या मशीदी, दर्गे तसेच साबरमती आश्रमही त्यांच्या निशान्यावर होतं.
त्यानंतर दुस-या दिवशी ते गांधीनगरला गेले. या ठिकाणी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय, विश्व हिंदू परिषदेच कार्यालय, हायकोर्ट, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, भाजप कार्यालयाला देखील भेट दिली. तसेच या स्थळांची त्यांनी फोटोग्राफी, व्हिडिओ देखील काढले. यासाठी त्यांनी या ठिकाणी भाड्याने गाडी देखील घेतली होती, असाही खुलासा शाहनवाज या दहशतवाद्यानं केला आहे.