21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रदिग्गजांनी साधला गुरुपुष्यामृताचा मुहूर्त

दिग्गजांनी साधला गुरुपुष्यामृताचा मुहूर्त

सर्वपक्षीय नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई : प्रतिनिधी
गुरूपुष्यामृताचा मुहुर्त साधत महाविकास आघाडी व महायुतीच्या दिग्गज उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गुरूवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत, पक्षाचे झेंडे फडकावत मोटारसायकल रॅली काढून तर काहींनी वाहन रथावर स्वार होत मतदारांना अभिवादन करून अर्ज दाखल केले.

पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. यामुळे गेल्या २ दिवसांत १५३ उमेदवारांचे १६४ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना बहुतांश उमेदवार मुहुर्त पाहतात. आज गुरूपुष्यामृतचा योग आला होता. तो साधत उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांसह काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार यादी जाहीर झालेली नसताना काँग्रेसच्या काही उमेदवारांनी आज अर्ज भरले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या शिवाय मुंबईतून भाजप उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिलमधून, भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमधून तर अमित साटम यांनी अंधेरीतून, अतुल भातखळकर यांनी कांदिवली, संजय पोतनिस यांनी कालिना विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमधून, जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून अर्ज दाखल केला. या शिवाय शरद पवार गटाच्या राजेश टोपे यांनी घनसावंगीतून, रोहित पाटील यांनी तासगावमधून, नारायण पाटील यांनी करमाळामधून, समरजित घाटगे यांनी कागलमधून, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनी अर्ज भरले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ यांनी येवलामधून, दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावमधून, धनंजय मुंडे यांनी परळीतून, गावित यांनी नवापूरमधून, भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीतून, सुरेश खाडे यांनी मिरजमधून, कालिदास कोळंबकर यांनी वडाळामधून, प्रशांत बंब यांनी गंगाखेडमधून, राहुल आवाडे यांनी इचलकरंजीतून, अशोक उईके यांनी राळेगावमधून उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी तिवसामधून, संग्राम थोपटे यांनी भोरमधून ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणमधून आज उमेदवारी अर्ज भरला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीणमधून, अर्जुन खोतकर यांनी जालनामधून, सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडीमधून, चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमधून, संजय रायमुलकर यांनी मेहकरमधून उमेदवारी अर्ज दाखल केले तर उद्धव ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांनी कुडाळमधून, राजन साळवी यांनी राजापूरमधून उमेदवारी अर्ज भरले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR