सोलापूर – महानगरपालिकेतर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पध्दतीने भाडे तत्वावर दिलेले मिनी व मेजर गाळे आणि खुल्या जागा यांचे भाडेकरू/मालक, क्षेत्र, व लोकेशन याची माहिती मिळावी, म्हणून छावाचे योगेश पवार यांनी भूमी व मालमत्ता विभागाकडे अर्ज केला होता. जनमाहिती अधिकारी यांनी सदरची माहिती शोधून देतो म्हणाल्यामुळे अपील करण्यास दोन दिवसांचा उशीर झाला. त्यामुळे विलंब माफ करून अपील दाखल करून घ्यावे व सुनावणी घेवून आदेश पारित करावेत. यासाठी योगेश पवार यांनी प्रथम अपीलिय अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते.
तेव्हा भूमी व मालमत्ता विभागाने अर्ज घेण्यास नकार दिला व सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज द्या, असे सांगितले. त्यामुळे योगेश पवार यांनी एका कार्यकर्त्यास सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर भेटण्यासाठी कार्यालयासमोर उभे केले. तिथे एक तास उभा राहूनही सहाय्यक आयुक्तांनी भेटही दिली नाही व त्यांच्या स्टेनोने संबंधित कार्यकर्त्यास अपमानास्पद वागणूक देवून आम्ही अर्ज देणार नाही, असे बोलून हाकलून दिले.
त्यामुळे योगेश पवार यांनी तिथे जावून अर्ज घेण्याची विनंती केल्यावर पुन्हा अपमानास्पद वागणूक देवून खोट्या केसेस करण्याची धमकी दिली व तुम्ही आयुक्ताकडे अर्ज द्या, असे सांगून हाकलून दिले. त्याच्या निषेधार्थ छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाकडे कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने अर्ज घेवून त्यावर पोच देण्यात आली. संवैधानिक पध्दतीने आंदोलन केल्यावर खोट्या केसेस दाखल केल्यास यावेळी योगेश पवार यांनीआत्महत्या करण्याचा इशारा दिला.