जेरुसलेम : पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत सक्रिय असलेल्या हमास या इस्लामिक गटाचा प्रमुख इस्माईल हानिया याची इराणची राजधानी तेहरानमध्ये त्यांच्या राहत्या घरी हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. हमासने या वृत्ताला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने दिलेल्या माहितीनंतर हमासकडून ही पुष्टी करण्यात आली आहे. या हल्ल्यात इस्माईल हानियाचा सुरक्षा रक्षकही मारला गेला आहे.
इराण रिव्होल्युशनरी गार्डस्च्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आज सकाळी हा हल्ला करण्यात आला. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. आयआरसीजीने एक निवेदन जारी करून इस्माईल हानियाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून, पॅलेस्टाईनच्या जनतेला पाठिंबाही व्यक्त केला. हमासने जारी केलेल्या निवेदनात इस्माईल हानियाच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे, यासोबतच हमासने हानियाच्या हत्येचा आरोपही इस्रायलवर केला आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. याआधी मंगळवारी इस्माईल हानिया इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिथे त्याने इराणच्या सर्वोच्च नेत्याचीही भेट घेतली.
दरम्यान, हानियावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. मात्र, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने हा हल्ला केला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगाच्या नकाशावर एक छोटासा देश असलेल्या इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला दहशतवाद्यांचे म्होरके त्याच्या नावानेच घाबरतात. अमेरिका, ब्रिटन, भारत आणि रशियापासून चीनपर्यंत अनेक देशांकडे गुप्तचर संस्था आहेत, ज्या अतिशय मजबूत आणि शक्तिशाली मानल्या जातात.