न्यूयॉर्क : इस्रायलच्या सामान्य नागरिकांवर हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या भयावह हल्ल्याला २ महिने उलटल्यानंतर संयुक्त राष्ट्रांत (यूएन) या विषयावर विशेष सत्र झाले. हमासने या हल्ल्यात इस्रायली महिलांविरुद्ध क्रूर लैंगिक गुन्ह्यांच्या सगळ्या हद्दी पार केल्याचा तसेच बलात्काराचा वापर युद्धातील एक शस्त्र म्हणून केल्याचा आरोप इस्रायलने त्यातून केला. पीडित महिलांचे व्हीडीओही या सत्रातून चालविण्यात आले. अपहरणानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी माझ्यावर धर्मसंमत कार्याच्या थाटात आळीपाळीने बलात्कार केल्याचे एका महिलेने सांगितले.
इस्रायलचे राजदूत गिलाड एर्दन म्हणाले, दुस-या महायुद्धानंतर जगातील सर्वांत मोठा नरसंहार इस्रायलने अनुभवला. इसिस आणि हिटलरने केलेल्या अत्याचारांहून कितीतरीपटीने अधिक क्रौर्य हमासच्या दहशतवाद्यांमध्ये संचारलेले होते. त्यांनी ज्यू कुटुंबांना जिवंत जाळले. आई-वडिलांसमोर लहान मुलांची शिरे धडावेगळी केली. हे सगळं करताना ते मोठमोठ्याने हसत होते. संगीत महोत्सवावरील हल्ल्यांतून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, महिलांवर गोळ्या झाडताना हमासचे दहशतवादी गुप्तांग आणि छातीचा नेमका वेध घेत होते. मृतदेहांवरील खुणा त्याचा सर्वांत मोठा पुरावा आहेत, असेही ही महिला म्हणाली.