जालना : हे लोक एकमेकांना संपवतील, त्यापेक्षा हा खटला फास्टट्रॅकवर चालवून त्यांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. बीडच्या कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची घटना घडली. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे म्हणाले, आज काय झाले त्याबाबत आपल्याला काही माहिती नाही. नेमके काय घडले हे प्रशासनाला माहीत असेल. हे आरोपी सोंग करणारे आहेत. लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार करतात. कुठे दुखत असल्याचे म्हणतील, अॅडमिट होतील, नाहीतर दुस-या जेलमध्ये जाऊ द्या म्हणतील. मारामारी नाही झाली तरी झाली असे म्हणतील असे मनोज जरांगे म्हणाले.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणाचा खटला लवकरात लवकर संपवणे गरजेचे आहे. हे लोक एकमेकांना संपवतील, त्यापेक्षा हा खटला फास्टट्रॅकवर चालवून यांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे मागणी त्यांनी केली आहे. तसेच या लोकांना सहकार्य करणा-यांना देखील पकडले पाहिजे, अशी विनंती देखील मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांना केली आहे.