28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeसंपादकीयआनंद परतला!

आनंद परतला!

आधी हेरगिरीचा आरोप, त्वरित अटक, वेगवान खटला चालवून दोषसिद्धी, न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा, नंतर या शिक्षेचे जन्मठेपेत झालेले रूपांतर आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक सुटका व मायदेशी घरवापसी व आनंदाला उधाण… एखाद्या थरारपटाला शोभणारी ही कहाणी! मात्र, ती चित्रपटाची कहाणी नाही तर प्रत्यक्षातला घटनाक्रम आहे! ही किमया घडली ती भारत सरकारच्या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे! कतारच्या भूमीवर दोषी ठरून शिक्षा ठोठावल्या गेलेल्या भारताच्या ७ माजी नौसैनिकांची झालेली सुखरूप घरवापसी हे भारत सरकारचे निश्चितच घवघवीत यश आहे. हे माजी नौसैनिक मायदेशी सुखरूप परतल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदच परतला आहे आणि त्यासाठी भारत सरकारचे अभिनंदन करायलाच हवे! कतारच्या सरकारने न्यायालयाने दोषी ठरविलेल्या ८ भारतीय माजी नौसैनिकांना भारत सरकारच्या यशस्वी शिष्टाईनंतर शिक्षेत माफी दिली.

त्यांच्या मायदेशी घरवापसीची मोहीम अतिशय गुप्तपणे पार पाडण्यात आली. या नौसैनिकांच्या कुटुंबीयांनाही याची कुठलीच कल्पना नव्हती. सुटका होऊन मायदेशी परतल्यावर या नौसैनिकांंनी फोन करून आपल्या सुखरूप सुटकेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली तेव्हा त्यांच्या घरात आनंदाला उधाण येणे साहजिकच! एक सुटका झालेला नौसैनिक तर भारतात परतला व त्याने येथून कतारमध्येच असलेल्या आपल्या पत्नीला फोन करून ‘मी भारतात परतलोय, तुही आता परत ये’, असा निरोप दिला. खरं तर आजवर परदेशांत भारतीयांना अशा प्रकारची शिक्षा कधी ठोठावली गेली नव्हती.

त्यामुळे सुरुवातीला या नौसैनिकांच्या कुटुंबीयांसह भारत सरकारही या अचानक धक्क्याने गडबडून गेल्याचे चित्र होते. मात्र, नंतर सरकारने कुठलीही उतावीळ वा आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त न करता भारतीय माजी नौसैनिकांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या सुटकेसाठीची शिष्टाई सुरू केली. कित्येक आठवडे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेली शिष्टाई अखेर फळाला आली व कतार सरकारने या आठ भारतीय माजी नौसैनिकांची शिक्षा माफ केली. या नौसैनिकांना खरोखरच मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागली असती तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मोठी नाचक्की झालीच असतीच पण देशात मोदी सरकारच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला असता. या नौसैनिकांवर ठेवण्यात आलेला हेरगिरीचा ठपका हाही देशाच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीरच होता. तो खरा ठरला असता तर देशाची मान खाली गेली असती. मात्र, भारत सरकारने मुत्सद्देगिरी दाखवून अगोदर या नौसैनिकांना ठोठावल्या गेलेल्या मृत्युदंडाचे रूपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत करण्यात व नंतर या शिक्षेलाही कतार सरकारकडून माफी मिळविण्यात केले. हे नि:संशय मोठे यश आहे. याबाबत भारत व कतार सरकार दरम्यान द्विपक्षीय बोलणी झाली असतील व काही अटी-शर्तीही घालण्यात आल्या असतील. भारत सरकारकडून अद्याप त्याबाबत काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, तूर्त या ८ नौसैनिकांचे प्राण वाचविण्यात आलेले यश नक्कीच मोठे आहे.

भारताच्या या आठ माजी नौसैनिकांना ऑगस्ट २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. कतारचे राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे कायदे हे अत्यंत कठोर आहेत. इस्रायल व आखाती देशांचे अगोदरच असणारे तणावपूर्ण संबंध आणि त्यात इस्रायलसाठी या आठ जणांनी हेरगिरी केल्याच्या आरोपामुळे कतारच्या न्यायालयाने वेगाने व सर्वोच्च प्राधान्याने या प्रकरणाची सुनावणी पार पाडणे व दोषींना कठोर शिक्षा ठोठावणे ओघाने आलेच! शिक्षा सुनावली गेल्यावर संपूर्ण जगाच्या नजरा या प्रकरणावर खिळणे साहजिकच! अशा वेळी दबाव दूर करण्यासाठी कुठल्याही सरकारकडून आक्रमक पवित्रा घेतला जाणे साहजिकच! मात्र, भारताने असे न करता प्रदीर्घ काळापासूनच्या कतारसोबतच्या दृढ संबंधांना धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. आपल्या नागरिकांचे प्राण वाचवून त्यांची सुखरूप घरवापसी करताना कतारसोबतचे संबंधही अजीबात बिघडू न देता त्या देशात मोठ्या संख्येने असलेल्या भारतीयांच्या हिताला बाधा पोहोचू द्यायची नाही, ही सगळी तारेवरची कसरतच! मात्र, भारत सरकारने ही कसरत अत्यंत संयमाने यशस्वी केली. आता हे नौसैनिक मायदेशी सुखरूप परत आल्यानंतर भारत सरकारने प्रयत्नपूर्वक पाळलेल्या मौनाचा अर्थ अधोरेखित होतो.

सुटका झालेल्या नौसैनिकांनी आपल्या सुटकेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. सरकारचे प्रमुख म्हणून ते साहजिकच! मात्र, तेवढ्यापुरते ते मर्यादित नाही. मोदींनी प्रयत्नपूर्वक आखातातील सर्व देशांशी ठेवलेला सुसंवाद व प्रस्थापित केलेले चांगले संबंध याचा या सुटकेत मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या हवामान परिषदेदरम्यान मोदींनी कतारचे अमीर शेख तामीम बिन हमद अल-थानी यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधला होता. ही चर्चा यशस्वी झाल्याचे संकेत त्या वेळीच मिळाले होते. तरीही पुढची प्रक्रिया किचकटच होती. ती परराष्ट्र खात्याने अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली हे अभिनंदनीयच! आठपैकी सात नौसैनिक आता सुखरूप मायदेशी परतले आहेत. पूर्णेंदू तिवारी हे अद्याप मायदेशी परतलेले नाहीत. त्यांच्या सुटकेसाठी कतार सरकारशी बोलणी सुरू आहेत. परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी स्वत: या प्रकरणावर निगरानी ठेवून आहेत. आज (१४ फेब्रुवारी) मोदी कतार दौ-यावर आहेत. मोदींच्या या दौ-याने या प्रकरणाची यशस्वी सांगता होण्याचे संकेत आहेत.

मोदींच्या जाहीर दौ-यात अगोदर कतार दौ-याचा समावेश नव्हता. तो ऐन वेळी करण्यामागे नौसैनिकांच्या सुटकेसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा हेतू नक्कीच असेल व पूर्णेंदू यांच्या सुटकेवर शिक्कामोर्तब होऊ शकते! कतारमध्ये जगातून गेलेल्या कामगारांपैकी ९० टक्के कामगार हे भारतीय आहेत. जवळपास ७ लाख भारतीय सध्या कतारमध्ये वास्तव्यास आहेत. भारत व कतारमध्ये १९ अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो. कतारच्या एकूण लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण २० टक्के आहे. हे सर्व लक्षात घेता हेरगिरीच्या आरोपाचे गंभीर प्रकरण दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण करणारे व कतारमध्ये असलेल्या भारतीयांच्या हिताला बाधा पोहोचविणारेच ठरले असते. भारत सरकारने अत्यंत कौशल्याने या प्रकरणाचा सुखद शेवट केला ही नक्कीच समाधानाची व आनंदाची बाब आहे हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR