23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रगरुडझेप अकॅडमीत विद्यार्थ्यांचा छळ

गरुडझेप अकॅडमीत विद्यार्थ्यांचा छळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पोलिस, सैन्य भरती करणा-या नामांकित गरुडझेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याच्या कारणावरून दोन विद्यार्थ्यांनी स्वत:चे आयुष्य संपवले. यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी या गरुडझेप अकॅडमीवर घातलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आले. अकॅडमीकडून विद्यार्थ्यांच्या छळाचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर थंड पाणी टाकून बेल्ट आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण करतानाचे व्हीडीओ सध्या समोर आले आहेत. यामुळे या अकॅडमीमध्ये येणा-या विद्यार्थ्यांचा थर्ड डिग्री छळ कसा होतो हे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पुणे, नाशिक यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये नामांकित म्हणून ओळखली जाणारी गरुडझेप अकॅडमी आहे. मात्र, मोठमोठ्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांना आकर्षित करणा-या या गरुडझेप अकॅडमीच्या संभाजीनगर शाखेमध्ये विद्यार्थ्यांचा छळ झाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी वाळूज येथील अकॅडमीवर छापा टाकला होता.

यामध्ये तपासणी केली असता विद्यार्थ्यांना सोयीसुविधा अपु-या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याचे समोर आले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पैशांसाठी छळ केला जात असल्याचे देखील समोर आले होते. यामुळे अनेक विद्यार्थी हे अर्ध्यातच शिक्षण सोडून माघारी परतत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR