नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण ८ संघ सज्ज झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा गतविजेत्या पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेतील सामने हे लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहेत. तर टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. मात्र त्याआधी दुबईतून एक व्हीडीओ समोर आला आहे.
या व्हायरल व्हीडिओमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू हरभजन सिंह आणि शोएब अख्तर धक्काबुक्की करत असल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हीडीओमध्ये शोएब अख्तर आणि हरभजन दोघेही एकमेकांना डिवचत असल्याचे जिसत आहे. त्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हरभजनला धक्का मारताना दिसतोय. मात्र या दोघांनी हे सर्व गंमतीत केले आहे. हा एका ईव्हेंटचा भाग आहे. हरभजन सिंह आणि शोएब अख्तर हे दोघेही काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. मात्र या दोघांमध्ये ऑन फिल्ड झालेली हमरीतुमरी क्रिकेट चाहत्यांनी अनेकदा पाहिली आहे.
दोघेही ऑन फिल्ड देशासाठी समर्पणाने खेळायचे. मात्र ऑफ फिल्ड दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही एकमेकांची थट्टा मस्करी करतात असेच काही या दोघांमध्ये दुबईत पाहायला मिळाले. व्हायरल व्हीडिओत दोघेही एकमेकांना ललकारताना दिसत आहेत. भज्जीच्या हातात बॅट आणि अख्तरच्या हातात बॉल पाहायला मिळतोय. दोघेही एकमेकांच्या दिशेने चालून येतात. दोघेही जवळ आल्यानंतर अख्तर भज्जीला धक्का देतो. त्यानंतर भज्जी अख्तरला हातवारे करुन बॉलिंग टाकायला सांगतोय असे वाटत आहे.