21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रहर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली

हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची केली घोषणा

इंदापूर : महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा भाजपला सुटणार नसल्याचे लक्षात येताच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.

काल शरद पवार यांना मुंबईत भेटल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा घेण्याची घोषणा करत थेट इंदापूर गाठले होते. त्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. इंदापुरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, आपण दोन गोष्टींसाठी आज जमलो आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आपण मतदारसंघात फिरतोय. फिरताना जनतेचा एकाच गोष्टीवर जोर आहे ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची.

ते पुढे म्हणाले, काल पवार साहेबांनी मला सिल्वर ओकला बोलवले आणि सांगितले की, हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातील लोकांची मागणी आहे की, तुम्हाला उमेदवारी द्यावी. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही पुढे काय करायचे. यावेळी पवार साहेबांनी मला त्यांच्या पक्षाच्या संदर्भातील काही गोष्टी सांगितल्या. त्याचबरोब मी सुद्धा माझ्याबाबत आणि कार्यकर्त्यांबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे पुत्र आणि कन्येने व्हाट्सअप स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवले होते. त्यामुळे पाटील लवकरच पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झाले होते. पाटलांच्या या निर्णयामुळे आता इंदापूरात पुन्हा एकदा दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता भरणे हॅट्ट्रीक करणार की पाटील त्यांना रोखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय प्रवास
हर्षवर्धन पाटील यांनी १९९५ मध्ये विधानसभेची अपक्ष निवडणूक जिंकत आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. पुढे ते १९९९ आणि २००४ मध्येही निवडणूक जिंकून आमदार झाले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये पाटील पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. पण २०१४ आणि २०१९ मध्ये पाटील यांना दत्ता भरणे यांच्याकडून दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR