पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करुन तुतारी हातात घेतली. आज इंदापूरमध्ये पक्ष प्रवेशाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह अनेक नेते उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगलाच दणका बसणार आहे.
एकीकडे हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय फायद्यासाठीच शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची टीका आता महायुतीमधील काही पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्मांच्या लोकांचा हा उठाव आहे. त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आपण प्रवेश करावा. त्यानुसार तो प्रवेश आज होतोय. माज्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने पक्षप्रवेश करत आहोत, असे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.
नाराज नेत्यांची समजूत काढू : सुप्रिया सुळे
दरम्यान, हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्यास काही नेत्यांनी विरोध केला आहे. या सर्व चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना आम्ही जेष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. त्यांची समजूत काढण्याची आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही ते करू असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पिक्चर अभी बाकी है: संजय राऊत
भाजपाचे इंदापुरातील नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रवेशाबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी महाविकास आघाडीत येणे हा आमच्या सगळ्यांसाठी शुभशकुन आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है, कळेल कोण कुठे आहेत आणि कोण कुठे जात आहेत ते. असे विधान राऊतांनी केले आहे.