पाटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. पुर्णिया येथील बनमंखी येथे बोलताना त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यांनी घराणेशाही, भ्रष्टाचार या मुद्यांवरून लालूंना टार्गेट केले.
भ्रष्टाचारामुळेच लालू प्रसाद यादवांना खुर्ची सोडावी लागली, त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री पदावर बसवले. आता ते त्यांच्या मुलांना पुढे करत आहेत असे नितीश म्हणाले. एनडीए उमेदवाराच्या प्रचारावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी (लालू प्रसाद यादव) अनेक मुले पैदा केली आहेत. कुणाली इतकी मुले जन्माला घालण्याची गरज असते का? त्यांच्या दोन मुली आणि दोन मुले पहिल्यापासूनच राजकारणात सक्रीय आहेत. मुळात ते करतात काय तर त्यांच्या वक्तव्यांमधून बातम्या तयार करतात. दुसरीकडे काँग्रेसने नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते ज्ञान रंजन यांनी दावा केला की, लालूंच्या कुटुंबावर नितीश यांनी केलेली टिपण्णी हे स्पष्ट करते की, नितीश यांच्याकडे दुसरे कुठलेच मुद्दे नाहीत. माजी केंद्रीय मंत्री आणि सासणचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी म्हटलं की, महाआघाडीच्या उमेदवारांकडे मुखवट्याशिवाय काहीही नाही. खरी लढाई ही लालू प्रसाद यादव यांच्याशी आहे. रुडी यांनी लालूंच्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप केला. ते म्हणाले, लालूंकडे उमेदवारच नाहीत. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवले आहे.