मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे झालेल्या शिबिरातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शरद पवारांचीच आधी इच्छा असल्याने राष्ट्रवादी-भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया घडली, असा दावाही त्यांनी केला. या अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी काही सवालही उपस्थित केले आहेत. शरद पवारांचा राजकीय प्रवास धुळीत मिळवून यांना सत्तेत यायचे होते, असे आव्हाड म्हणाले आहेत.
तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत, हे अख्या जगाला माहित आहे. शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ज्यांनी तुम्हाला घडवले त्यांच्यावर बोलता, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. यांना हा पक्ष दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राज्यात कोणालाही विचारले तर कोणीही सांगेल की खरी राष्ट्रवादीही शरद पवार यांचीच आहे. शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला का हवा होता? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला. ते जर बारामतीतून निवडणूक लढवत असतील तर यात गाजावाजा करण्याची गरज काय? असेही आव्हाड म्हणाले. आपल्या इथे पण निवडणुका लागल्या की सर्व स्वस्त होईल. निवडणुका झाल्या की परत महाग होईल. त्यामुळे महाराष्ट्राने सावध राहावे असे आव्हाड म्हणाले. पवारसाहेबांनी आधीपासून जातीयवादी शक्तीसोबत हात मिळवणी केली नाही ही यांची अडचण होती असे आव्हाड म्हणाले.