नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी प्रचारगीत जारी केले. ‘हम साथ हैं तो हाथ ये हालात बदल देगा’ असे त्या गीतामध्ये नमूद करण्यात आले आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रचारगीत लॉन्च केले.
काँग्रेसने प्रचारात पाच न्यायांवर भर दिला आहे. महिला न्याय, युवक न्याय, शेतकरी न्याय, कामगार न्याय आणि हिस्सेदारी न्याय यांचा त्यामध्ये समावेश आहे. प्रचारगीतातही त्या न्यायांवर फोकस ठेवण्यात आला आहे.
संबंधित न्याय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्या जाहीरनाम्याला काँग्रेसने न्यायपत्र असे नाव दिले आहे. लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम विविध टप्प्यांत राबवण्याची त्या पक्षाची रणनीती आहे.
त्यातून पक्षाकडून काही दिवसांपासून ‘मेरे विकास का दो हिसाब’ या मागणीवर आधारित जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. आता गीताच्या माध्यमातून प्रचाराचे ग्लॅमर आणखी वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.