धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे एका दारूड्याने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेला शिवीगाळ केली. हे लागलेले भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पोलीस पाटलाला त्या दारूड्याने शिवीगाळ करून बुटाने मारहाण केली. ही घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्गी ता. उमरगा येथील श्रीशैल शिवराय्या पाटील हे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात दारू पित होते. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बब्रुवान शिंदे यांना ते शासकीय काम करीत असताना आरोपी श्रीशैल पाटील याने सरकारी कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळी करत होता. यावेळी डिग्गी गावचे पोलीस पाटील श्रीराम जमादार हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करुन बुटाने मारहाण केली.
गावकरी भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मुख्याध्यापिका सुनिता शिंदे यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे कलम ३५३, ३५४, ३२३, ५०४, ५०६ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.