न्यूयॉर्क : जागतिक हवामान बदलाच्या संकटामध्ये आता सुपर-डुपर अल-निनोची भर पडली असून जागतिक हवामान संघटनेने अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य सरासरीपेक्षा तब्बल ३.७ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे जगभरातील ऋतूचक्र पूर्णत: विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, यावेळी तयार होणारा अल-निनो अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली आहे. जून २०२६ मध्ये या भागात तापमान सरासरीपेक्षा १.६ अंश जास्त नोंदवले गेले होते. ऑगस्टपर्यंत ही वाढ २.५ अंशांवर पोहोचली. आता वर्षाच्या अखेरीस हा आकडा ३.७ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठू शकतो. यापूर्वी नोव्हेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान निनो ३.४ चे तापमान २.६ अंशांनी वाढले होते. चालू वर्षातील वाढ हा सर्व जुना इतिहास मागे टाकणारी ठरेल. हा अल-निनो डिसेंबरच्या सुमारास आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचेल आणि त्याचा प्रभाव किमान फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहील.
हवामानावर काय परिणाम होणार?
समुद्राच्या पृष्ठभागाखालील पाणीही मोठ्या प्रमाणावर तापल्याने जागतिक वातावरणावर त्याचा थेट परिणाम दिसेल. जगातील बहुतांश देशांमध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णता जाणवेल. काही देशांमध्ये पाऊस अचानक गायब होऊन तीव्र दुष्काळ पडेल, तर काही भागांमध्ये ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस आणि महापुराचा धोका उद्भवेल. भारतात मान्सूनोत्तर पावसावर आणि रब्बी हंगामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, उन्हाळ्याची चाहूल लवकर लागून उष्णतेची लाट तीव्र होऊ शकते.
उष्णतेमुळे लाखो नागरिकांचा जीव धोक्यात
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने या सुपर अल-निनोच्या दुष्परिणामांवर एक धक्कादायक अहवाल दिला आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार, जून २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान जगभरात उष्णतेशी संबंधित त्रासामुळे सुमारे ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. एकट्या भारतात सुमारे १५,८०० हून अधिक नागरिकांना तीव्र उष्माघातामुळे जीव गमवावा लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. डब्लूएमओच्या या इशा-यानंतर जगभरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
















