नवी दिल्ली : रविवार दि. १६ मार्च रोजी देशाच्या वेगवेगळ्या भागात हवामानाचे वेगवेगळे परिणाम दिसून आले. ओडिशाच्या बौधमध्ये तापमान ४२.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे देशातील सर्वाधिक आहे. उष्णतेमुळे ओडिशामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१४ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर शुक्रवारी ते ३६.२ अंशांवर पोहोचले होते. दुुसरीकडे, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पाऊस सुरूच आहे. चार जिल्ह्यांतील उंच भागात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक रस्ते बंद झाले आहेत आणि लोकांना रुग्णालयात पोहोचण्यात अडचणी येत आहेत. देशात उष्णता, पाऊस आणि बर्फवृष्टीचे परिणाम एकाच वेळी दिसून येत आहेत, त्यामुळे पुढील काही दिवस हवामान आव्हानात्मक राहील.
वादळाची शक्यता
पुढील एका आठवड्यात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जोरदार वारे आणि धुळीची वादळे येण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील तेलंगणामध्ये १८ मार्चपर्यंत अशीच परिस्थिती राहील. मध्य भारतातील छत्तीसगडमध्ये २ दिवसांत तापमान २ अंशांनी वाढू शकते. पुढील ४८ तासांत वायव्य भारतातील मैदानी भागात कमाल तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता नाही आणि त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात तापमान घटण्याची शक्यता
गुजरात, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम राजस्थानसह संपूर्ण पश्चिम भारतात पुढील ३-४ दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते तर छत्तीसगडसह मध्य भारतात पुढील ३ दिवसांत कमाल तापमानात किमान २ अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते आणि त्यानंतर ते स्थिर राहू शकते. गंगानगर, हनुमानगड, झुनझुनू येथे दिवसाचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले. भरतपूर आणि जयपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये आज दुपारी हलके ढग राहतील आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय तापमानात आणखी २ अंश सेल्सिअसने घट होऊ शकते.