Homeमहाराष्ट्रउष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू

उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू

वणी : प्रतिनिधी
राज्यात वाढत्या उष्णतेने सर्वसामान्य जनजीवनासह आता पशु-पक्ष्यांनाही हैराण केले आहे. सुरगाणा तालुक्यात सध्या तापमानाचा पारा ३७ अंशांच्या आसपास पोहोचला असून, या भीषण उन्हाचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. बंदिस्त शेडमध्ये वाढवल्या जाणा-या कोंबड्यांना उष्माघाताचा तीव्र फटका बसत असून, दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. जणू सूर्य आग ओकत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही पोल्ट्री फार्ममध्ये उष्माघातामुळे दररोज ५० ते ८० कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

तापमान ३७ अंशांच्या वर गेल्याने कोंबड्यांची सहनशक्ती संपत आहे. शेडमधील कोंबड्यांना हवा खेळती न मिळाल्यास उष्माघाताचा धोका अधिक वाढतो. उन्हाळा नुकताच सुरू झाला असून, तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती आगामी काळात अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उष्णतेमुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचे खाणे-पिणे मंदावले आहे. आगामी दिवसांत तापमानाने उच्चांक गाठल्यास पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR