नवी दिल्ली/ पुणे : देशात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. एकीकडे देशातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे, तर दुसरीकडे २३ राज्यांना अतिवृष्टी आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टबन्समुळे जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये २५ आणि २६ एप्रिल रोजी वादळी वा-यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बांगलादेश आणि आसामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पूर्व भारतात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आसाम, मेघालय, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम, नागालँड, या राज्यांमध्ये पुढील सात दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच या राज्यांमध्ये वादळे देखील होणार असून, या काळात ताशी ६० ते ७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारताना देखील पाऊस झोडपून काढणार आहे. दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आध्र प्रदेश आणि पाँडेचेरी या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा
महाराष्ट्रात मात्र उष्णतेचा तडाखा बसणार आहे, आणखी काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. राज्यात ब्रम्हपुरीमध्ये सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला हाय अलर्ट देण्यात आला आहे.