18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

परभणी / प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाल्यांना पाणी आले असुन शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले आहेत. पाण्याची आवक वाढत असल्याने पाथरी तालुक्यातील मुदगल धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले तर गंगाखेड तालुका मासोळी धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान पुर्णा ते झिरो फाटा व दैठणा माळसोन्ना या रस्त्यावरील वाहतुक पुर्णत: ठप्प झाली आहे.

परभणी जिल्ह्यात यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वदुर झालेल्या या पावसामुळे जिवीत वा वित्त हानी झाली नसली तरी शेतात पाणी साचल्याने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे पालम तालुक्यातील लेंडी नाल्याला पुर आला आहे. पाथरी तालुक्यातील मुदगल धरणाचे दोन दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प १०० टक्के भरल्याने या धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. संततधार पडत असलेल्या या पावसामुळे लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

येलदरी धरण ४१.८६ टक्के, तारूणगव्हाण बंधारा ४२ टक्के पाणी साठा आहे. दरम्यान सततच्या या पावसामुळे दैठणा ते माळसोन्ना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील पुना नदीला पुर आल्याने पुर्णा ते झिरो फाटा या रस्त्यावरील वाहतुक बंद झाली आहे. सेलू शहरात १०२ मी.मी. पाऊस झाल्याने अतिवृष्टीसदृष्य पाऊस झाल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. अर्जुन नगर, सहारा नगर व नाला रोड शनिमंदिर या भागात पाणी तुंबल्याने तीन फटा रस्ता पाण्यात गेला होता. दरम्यान या परिसराची पाहणी तहसिलदार डॉ. शिवाजी मगर व तलाठी एम.ए. आष्टीकरण यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR