चेन्नई : वृत्तसंस्था
तीव्र अल निनो परिणामामुळे बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान घातले आहे. यामुळे ८ वर्षांपूर्वीची स्थिती आज पुन्हा अनुभवायला मिळाली. २०१५ मध्ये झालेल्या भीषण पावसासारखा पाऊस आज २०२३ मध्ये शहरात कोसळला. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले. तसेच सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने वाहतूक खोळंबली आणि अख्खी राजधानी चेन्नई तुंबली. दरम्यान, पावसाच्या तडाख्यात ६ जणांचा बळी गेला.
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नई शहरातील विविध भागात तुफान पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ट्रेन, बस, विमानसेवा ठप्प झाली. चेन्नईचा विमानतळाचे तर शब्दश: तळ््यात रुपांतर झाले. पार्किंगमधील विमानांच्या चहुबाजूने पाणीच पाणी झाले.
आज सार्वजनिक सुटी
मिचॉन्ग चक्रीवादळ आणि भीषण पावसामुळे तामिळनाडू सरकारने राज्यातील ४ जिल्ह्यांत उद्या ५ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली. यामध्ये कांचीपुरम, थिरुवल्लूर, चेंगलपट्टू, चेन्नई या जिल्ह्यांचा समावेश आहे. उद्या दुपारी १२ वाजता हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किना-यावर धडकणार आहे. वादळाच्या भीतीमुळे किनारपट्टीच्या भागात राहणा-या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी १८१ रिलिफ कॅम्प तयार करण्यात आले. चक्रीवादळाचा परिणाम होणा-या ८ जिल्ह्यांमध्ये कॅम्प असणार आहेत. तसेच या भागात ५ एनडीआरएफ तसेच ५ एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.