सोलापूर : दिवाळीत नातेवाइकांच्या घरी आलेले आणि आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले लोक आता पुन्हा गावाला परतू लागले आहेत. यामुळे परतीच्या एसटी गाड्या फुल्ल होऊन धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात पुणे, नाशिक, नांदेड, औरंगाबाद या मार्गावरील एसटी गाड्या भरगच्च धावत असल्याची माहिती अधिका-याने दिली.
दिवाळीच्या सणासाठी एसटी प्रशासनाकडून जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. यामुळे अनेक प्रवाशांची सोय होत आहे; पण तरीही अनेक मार्गावर एसटी गाड्या कमी पडत आहेत. सध्या प्रवाशांची संख्या इतकी वाढली आहे की, स्थानकातून एसटी गाड्यांना बाहेर पडण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागत आहेत. शिवाय प्रवाशांचा लोंढा मागील पाच दिवसांपासून कायमच असल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे एसटीचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या एसटी गाड्यांचे वेळेत धावण्यासाठी पूर्वीच नियोजन करण्यात आले आहे; पण प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाचे नियोजन कमी पडल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर विभागातून पुण्यासाठी दररोज २० एसटी गाड्या सोडण्यात येतात; पण दिवाळीत प्रवाशांच्या सोयीसाठी ही संख्या तीस करण्यात आली आहे; पण तरीही प्रवाशांची संख्या वाढतच आहे.
सध्या अनेक गाड्यांमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. यामुळे गाड्यांना उशीर लागत आहे. सध्या लांब पल्ल्यांच्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे प्रवाशांची सोय होत आहे; पण त्यासोबत ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे. यातूनच कुडलसाठी पाठवण्यात आलेल्या एसटी गाडीला एका फेरीतून विक्रमी २१ हजारांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती अधिका-याने दिली.