36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात जोरदार वादळासह गारपीट

नागपुरात जोरदार वादळासह गारपीट

नागपूर : वेधशाळेच्या अंदाजानुसार मंगळवारी सायंकाळच्या सुमारात जोराच्या वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यात चांगलेच थैमान घातले. अनेक भागात गारपीट झाली. भिवापूर तालुक्यात एक बैलजोडी व रामटेक तालुक्यात एक बैल विज पडून ठार झाला. नागपूर शहरातही जोरदार वादळाने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली, होर्डिंग फाटले, विजेचे तार तुटले व टीनही उडाले. हवामान विभागाचा अंदाज मंगळवारी खरा ठरला. आठवडाभर नागरिक उन्हाने होरपळल्यानंतर मंगळवारी पहाटे वातावरणाने कुस बदलली.

पहाटे ३ वाजतापासून वादळासह हलक्या पावसाने हजेरी लावली. सकाळपासून मात्र ढगांच्या उपस्थितीत पुन्हा सूर्याचा ताप वाढला. दुपारपर्यंत उन-सावलीचा खेळ सुरू राहिला. दुपारी ३ वाजतापासून वातावरण पुन्हा बदलले. रामटेक तालुक्यात ३.३० वाजतापासून ढगांचा गडगडाटासह जोराचे वादळ सुरू झाले. मौदा तालुक्यातही वादळासह अर्धा-पाऊन तास गारपीटीसह पावसाच्या सरी बरसल्या. भिवापूर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा बसला. पांजरेपार गणपत लांबट या शेतक-याच्या शिवारात चार बैल व गायी बांधून होत्या. अचानक वीज पडल्याने त्यातील दोन बैल ठार झाले. दुसरीकडे खातखेडा येथे वीज पडून एक म्हैस मृत्युमुखी पडली व एक बैल जखमी झाला. दुसरीकडे रामटेक तालुक्यात मांगली शिवारात वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यु झाला.

पावसासह आलेले सोसाट्याचे वादळ इतके वेगात होते की त्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. नागपूर शहरात सिव्हिल लाईन्स व गंजीपेठ येथे झाडे कोसळली. अनेक ठिकाणी झोपड्यांच्या छतावरील टीन उडल्याच्याही घटना घडल्या. होर्डिंगवरचे टीन व कपड्याचे बॅनरही फाटून हवेत उडाले, ज्यामुळे विजेची तारे तुटल्याने काही भागातील विज पुरवठा बंद पडला. उत्तर व पूर्व नागपुरात गाराही पडल्या.

सायंकाळी कार्यालयीन सुटीच्या वेळी झालेल्या या वादळी पावसाने चाकरमान्यांची भलतीच तारांबळ उडाली. वादळामुळे दुचाकी वाहनांचे संतुलन बिघडल्याने वाहनचालक पडल्याची माहिती समोर आली आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाने भीतीदायक स्थिती झाली होती. सायंकाळच्या पावसाने दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR