33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरअभिनव मतदान केंद्रांची संकल्पना ठरली लक्षवेधी

अभिनव मतदान केंद्रांची संकल्पना ठरली लक्षवेधी

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया अतिशय शांततामय आणि उत्साही वातावरणात पार पडली. मतदारांनी सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावून मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारसंघात लातूर मतदारसंघात ५५.३८ टक्के मतदान झाले होते. तसेच ५ नंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी तिस-या टप्प्यात झालेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव मतदान केंद्रांचा उपक्रम लक्षवेधी ठरला.
तसेच उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेवून मतदान केंद्रांवर सावलीसाठी उभारण्यात आलेले मंडप, पिण्याचे थंड पाणी, प्रथमोपचार सुविधा यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याने त्यांचे मतदान सुस  झाल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिल्या. लातूर मतदारसंघात सर्वत्र सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली.  सुरुवातीपासूनच मतदार मोठ्या संख्येने मतदानास बाहेर पडल्याचे दिसत होते. सकाळी ९ पर्यंत सुमारे ७.९१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवा मतदार यांची संख्या लक्षणीय होती.
सकाळी ९ नंतर महिला मतदारांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून आली. सकाळी ११ पर्यंत सुमारे २०.७४ टक्के नागरिकांनी आपला हक्क बजाविला. अनेकजण सहकुटुंब मतदानासाठी आल्याचे चित्र यावेळी दिसत होते. मतदान केंद्रांवर करण्यात आलेली सावलीची सुविधा, पिण्याचे थंड पाणी यामुळे उन्हातही मतदारांना आपला अधिकार बजाविण्यास मदत झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदारसंघात अंदाज ३२.७१ टक्के मतदान झाले होते, तर दुपारी ३ पर्यंत मतदानाची टक्केवारी सुमारे ४४.४५ इतकी झाली  होती. तसेच सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५५.३८ टक्के मतदान झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR