सोलापूर : रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा नेहमीच राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक समितीने विशेषतः ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जाणार आहे. आता दुचाकीवरील पुढे बसलेल्यासह मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे.
दुचाकीस्वाराकडे हेल्मेट आहेपण मागच्या व्यक्तीकडे नसेल तरी एक हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. महामार्गांचे जाळे सर्वत्र विस्तारल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लेन कटिंग, ट्रिपलसीट दुचाकी, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालवणे, मद्यपान करून वाहन चालविणे, १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच वाहन चालविणे, अशा बाबींवर कारवाईवेळी अधिक फोकस केला जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्ह्यात सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू होणाऱ्या ठिकाणांना (ब्लॅकस्पॉट) आरटीओ, वाहतूक पोलिस, महामार्गाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संयुक्तपणे पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार
आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुसती पाहणी व तात्पुरत्या उपाययोजना न करता त्या अपघातप्रवण ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने ही पाहणी होणार आहे. रस्त्यालगत विशेषतः महामार्गालगत उभारलेली खोकी तथा हातगाड्यांवर कारवाई केली जाणार आहेसर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणाजवळील हॉटेल, पेट्रोलपंपाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने रस्ते अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे, महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी व ठोस उपाययोजना केल्या जातील. रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर गुन्हेही दाखल होतील. अपघात रोखण्यासाठी महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचेही नियोजन आहे.असे सोलापूर ग्रामीण वाहतूक वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सांगीतले.
पहिल्यांदा रस्त्यावर तथा महामार्गावर वाहन चालविणाऱ्याने वाहतूक नियम मोडला आणि त्याला दंड झाल्यास सुरवातीला दंड भरण्याची घाई केली जाणार नाही. दुसऱ्यांदाही अशीच स्थिती राहील, पण तिसऱ्यांदा वाहतूक नियम मोडल्यास यापूर्वीचा सगळा दंड त्या वाहनचालकाला जागेवरच भरावा लागणार आहे. दंड न भरल्यास त्याचे वाहन जप्त करण्याची करवाई केली जाणार आहे, असेही वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे.