रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी २९ जानेवारी रोजी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शोध मोहिमेत सहभागी असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिका-यांविरोधात रांचीमध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा एफआयआर एसटी-एससी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. रांची एसएसपी चंदन कुमार सिन्हा यांनी मीडियाला सांगितले की, “मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांची टीम माहिती न देता त्यांच्या घरी गेली आणि त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या.
रांची पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत वृत्तसंस्थेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अर्ज पाठवून अहवाल दाखल करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अर्ज धुर्वा पोलिस ठाण्यात पाठवला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीत ईडीच्या अधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितले आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत दिल्लीतील शांती निकेतन येथील त्याच्या निवासस्थानावर छापा टाकला आणि तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले.
पत्नीची मुख्यमंत्रीपदी वर्णी?
तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या ईडी चौकशीमुळे चर्चेत असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास त्यांच्या पत्नीची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यात सत्ताबदलाबाबत सट्टाबाजार सुरू आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर पत्नी कल्पना या झारखंडच्या नव्या मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे. सरकारच्या पुढील पावलावर झामुमो म्हणजेच झारखंड मुक्ति मोर्चाचे नेते मौन बाळगून आहेत.