रांची : झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचून चौकशी केली. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रांची प्रशासनाने हिनू विमानतळावरील ईडी कार्यालयाची सुरक्षा वाढविली आहे. कार्यालयाबाहेर पोलिसांच्या बॅरिकेड्ससह सीआरपीएफचे जवान तैनात आहेत.
मुख्यमंत्री निवास्थानाबाहेरही कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून रांचीतील वरिष्ठ पोलिस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून १००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ईडी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री निवास्थाबानाजवळ ट्रॅफिक डायव्हर्जन राहील, तसेच येण्या-जाण्यावरही बंदी असेल. तत्पूर्वी, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने राज्याच्या पोलीस प्रमुखांना एक प्रत्र लिहून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासंदर्भात विनंती केली होती.
ईडीने गेल्या १३ जानेवारीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आठव्यांदा समन्स जारी करून त्यांना १६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान चौकशीसाठी उपलब्ध राहण्यास सांगितले होते. यापूर्वी ते ७ समन्स मिळूनही ईडी समोर हजर झाले नव्हते. यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा २० जानेवारीला आपल्या निवासस्थानी निवेदन घेऊ शकते, असे ईडीच्या समन्सला उत्तर देताना मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटले होते.