बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना सारख्या विषाणूचा उद्रेक पाहायला मिळतोय. एचएमपीव्ही म्हणजेच मानवी मेटान्यूमोव्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. अनेक लोकांना याची लागण झाली असून चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे.
स्मशानभूमीतही मृतदेह दफन करण्यासाठी लांबच लांब रांगा दिसत आहेत, पण चीन हे मानायला तयार नाही. सोशल मीडियावर फिरत असलेले वृत्त चीनने फेटाळले आहे. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील चीन सुरक्षित असल्याचे बिजींगकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यातून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या आरोग्य मंडळाने जिल्हा रुग्णालयांना पत्र लिहलं असून यामध्ये माहिती दिली असून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाने लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.