26.7 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeराष्ट्रीयप्रामाणिक चोर; चोरी नंतर घरमालकाला दिली पैसे परत करण्याची लेखी हमी

प्रामाणिक चोर; चोरी नंतर घरमालकाला दिली पैसे परत करण्याची लेखी हमी

तुतीकोरीन : तामिळनाडूमध्ये चोरीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तुतीकोरीन जिल्ह्यातील एका घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी रोख रक्कम व दागिने गायब असल्याचे आढळून आले. मात्र, रिपोर्टनुसार या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोराची चिठ्ठी.

ही चोरीची घटना ७९ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक चिथिराई सेल्विन यांच्या घरी घडली आहे. सेवानिवृत्त शिक्षक सेल्विन यांच्या कुटूंबात पत्नी आणि चार मुले आहेत. चेन्नईतील आपल्या मुलाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हे जोडपे १७ जून रोजी घराबाहेर पडले होते. मंगळवारी रात्री मोलकरीण घरी पोहोचली तेव्हा घराचे गेट उघडे पाहून तिला धक्काच बसला. घरात कोणीतरी शिरल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने ताबडतोब मालक व पोलिसांना बोलावले.

चोरट्याने ६० हजारांची रोकड, दोन जोड सोन्याचे कानातले आणि चांदीचे पैंजण असा ऐवज पळवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. मला माफ करा अशी चिठ्ठीही चोरट्याने ठेवली आहे. मी ते एका महिन्यात परत करीन. माझ्या घरात कोणीतरी आजारी आहे. म्हणूनच मी हे करत आहे. मेघनापुरम पोलिसांनी चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR