विश्वचषक स्पर्धेत सलग दहा सामने जिंकल्यानंतर अकराव्या सामन्यात भारतीय संघाला दणदणीत पराभव स्वीकारावे लागला. त्यांचे तिस-यांदा विश्वचषक विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न साकार झाले नाही. कांगारूनी मात्र सहाव्यांदा विश्वचषक जेतेपद तर भारतात दुस-यांदा मिळवले. १९८७ च्या रिलायन्स विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला कोलकाता येथे ७ धावांनी हरवून कांगारू कर्णधार एलन बॉर्डरने पहिल्यांदा जेतेपद मिळवले होते. त्या पराभवाचे कारण होते इंग्लंड कर्णधार माईक गँटिंग स्वीपचा चुकीचा फटका. ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात कर्णधार अँलन बॉर्डरने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली व इंग्लंड समोर विजयासाठी २५४ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण शेवटच्या क्षणी माईक गॅटिंगच्या स्वीप फटक्यामुळे इंग्लंडला सात धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
अहमदाबाद मधील एक लाख बत्तीस हजार प्रेक्षकांच्या समोर कांगारुंनी भारतातील दुसरा एकूण सहाव्यादा विश्वचषक जिंकला. कांगारू खेळाडू प्रचंड व्यावसायिक आहेत. त्यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला खेळपट्टीची सखोल पाहणी केली. छायाचित्र घेऊन त्यातील उणिवा बरोबर हेरल्या. सामन्याच्या दिवशी नाणेफेकीचा कौल कांगारूंच्या बाजूने लागल्याबरोबर भारताला फलंदाजी दिली. कांगारूंचे क्षेत्ररक्षण तर अफलातून होते. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माचा चौकार सीमारेषेवर अर्ध्या फुटावर अडवला, चौकाराचे रूपांतर एकेरी धावेत झाले आणि शंकेची पाल चुकचुकली. खरे तर प्रत्येक खेळाडूच्या उणिवा त्यांनी बरोबर हेरल्या होत्या. श्रेयस अय्यर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, शुभमन गिल, रोहित शर्मा यांना फलंदाजी मोकळीक न देता तंबूत परतण्यास भाग पाडले. कर्णधार तर चाळीशीच्या वर खेळायलाच नको म्हणतो ,संपूर्ण स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघ सर्व बाद ऑल डाऊन झाला. दिवसा खेळपट्टी फारच संथ होती. एकही चेंडू बॅटवर येत नव्हता कांगारूं त्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे कमीत कमी २५ते ३० धावा तरी वाचवल्या. धावांचा पाठलाग करणा-या कांगारू फलंदाजांची पहिल्या तीन विकेट बाद झाल्यानंतर तंबूत परतल्यानंतर मात्र सोपी झाली.
दवाचा लवलेशही नव्हता आणि चेंडू व्यवस्थित बॅट वर येत होता. त्यामुळे ट्रॅव्हिस हेड आणि मानस लाबुशेन यांनी शेवटपर्यंत फलंदाजी करत भारतीय फिरकी गोलंदाजांची दाणादाण उडवली. भारतीय संघातील एकाही खेळाडूच्या चेह-यावर आपण सामना जिंकावा अशी भावना नव्हती. पहिले तीन गडी बाद होते तोपर्यंत ठीक होतं त्यानंतर हळूहळू सामन्यातला रसच निघून गेला. कांगारून दणदणीत विजय मिळवत सहाव्यांदा विश्वचषक मायदेशी नेला. संख्याशास्त्राप्रमाणे लॉ ऑफ अॅव्हरेजेस बद्दल विचार करावयाची गरज होती. खरे तर एखाद्या सामन्यात पराभव झाला तर चालले असत तरीही काही म्हणा कांगारूंचा संघ क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल होता. सलग दहा विजयानंतर भारतीयांनी अंतिम सामना म्हणजे एक इव्हेंटच केला होता.
प्रत्येक गावात प्रार्थना नंतर सार्वजनिक ठिकाणी स्क्रीन लावून सामना पाहण्याची सोय आणि भारतच जिंकणार अशी सर्वांची अपेक्षा होती. टीम इंडिया ने मात्र सर्व क्रिकेट रसिकांच्या उत्साहावर विरजण पाडले. टीम इंडिया आपले ध्येय साध्य करू शकले नाही. तसं भारतीय संघाने अंतिम सामन्यात लढत अशी दिलीच नाही. सामना चक्क सोडून दिल्यासारखे वाटत होते.
– मैदानाबाहेरून
डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर