पुणे : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राचा कौल नक्की कोणाच्या बाजूने राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आपला अंदाज वर्तवला असून राज्यात महाविकास आघाडीला २४ जागा मिळू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान पवार यांना लोकसभा निवडणूक निकालाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या. यामध्ये आमच्या पक्षाला चार जागा, एक जागा काँग्रेस आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. यामध्ये यंदाच्या निवडणुकीत तिप्पट जागांची तरी वाढ होईल. राज्यातील ४८ जागांपैकी ५० टक्के जागा आम्हाला मिळाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. यामध्ये बारामतीची जागा तर असेलच असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
महायुतीकडून ४५ प्लसचा नारा
राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने अब की बार ४०० पार असा नारा दिलेला असून ही मोहीम फत्ते करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, आरपीआय आठवले गट या पक्षांच्या महायुतीने राज्यात ४५ प्लसचा नारा दिला आहे.
ओपिनियन पोलचा अंदाज काय?
एबीपी न्यूज आणि सी व्होटर यांनी संयुक्तरित्या नुकताच एक ओपिनियन पोल केला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप प्रणित महायुतीला ३० जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये दाखवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला १८ जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अन्य किंवा अपक्षांच्या खात्यात एकही जागा जाणार नसल्याचा अंदाज आहे.