सतीश टोणगे
कळंब : सध्या लोकसभेचा आखाडा तापू लागला आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच राजकारणही चांगलेच रंग धरू लागले आहे. प्रत्येक गावामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. प्रत्येक गावातील मराठा समाजाचे तरुण येणा-या उमेदवाराला व त्यांच्या कार्यकर्त्यांना मराठा समाजातील नेत्यांनी काय केले, सगेसोयरे अध्यादेशासाठी काही पत्र दिले आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा सभागृहात याबद्दल काही मांडणी केली आहे का, असे प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. जोपर्यंत सगेसोयरेचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या दारात का आलात व कशासाठी आलात, आम्ही तुम्हाला मतदान करणार नाहीत, असा इशाराही देण्यास विसरत नाहीत.
धाराशिव जिल्ह्यातही प्रत्येक गावामध्ये असे प्रश्न दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना विचारले जात आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी आमदार राणा पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्यांचा निषेधही करण्यात आला होता. परंतु आता त्यांच्याच पत्नी अर्चनाताई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रत्येक गावामध्ये या प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे.
आमच्या समाजासाठी आपण काय केलं, या एकाच प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही वेशीच्या आत या, अशी विनंती करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचे वादळ प्रत्येक जिल्ह्यात असून कळंबपासून जवळच असलेल्या बीड जिल्ह्यातही मध्यंतरीच्या काळामध्ये पंकजाताई मुंडे यांची गाडी अडवून मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.
तिथे सौम्य लाठीमारही झाला. केज तालुक्यातील बरीचशी गावे कळंब शहराच्या व्यापाराशी निगडित असल्याने येथे मोठा बीड जिल्ह्याचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे या दोघांनाही मराठा आरक्षणावर काय केले व काय करणार, यावर भाष्य करावे लागणार आहे. अंबाजोगाई, केज, धारूर आदी ठिकाणी ग्रामीण भागातील गावांमध्ये प्रत्येक घराच्या दरवाजावर मराठा समाजाने बोर्ड लावून आरक्षणाच्या संदर्भात इशारा दिला आहे. सगेसोयरे अध्यादेश जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या दारात येऊ नका, अशा स्पष्ट इशा-याचे बोर्ड घरोघरी लावल्याने उमेदवारांची चांगलीच पंचायत झाली आहे.