19.7 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रअंड्यांच्या दरात मोठी वाढ

अंड्यांच्या दरात मोठी वाढ

- थंडीत मागणी वाढली - डझनभर अंड्यांसाठी मोजावे लागत आहेत ९४ रुपये

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तापमानातील सततच्या चढ-उतारांमुळे थंडीचा कडाका जाणवत नसला तरी वातावरणात गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे अंड्याचे दर वाढले आहेत. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात ख्रिसमस, नववर्षाचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रमाण जास्त असते. यंदाही हा ट्रेंड कायम असल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे. घरगुती वापर, बेकरी आणि हॉटेल्सकडून अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत एक डझन अंड्यांचा दर ९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात एक डझन अंड्यांचा दर ८० ते ८४ रुपये इतका होता. मात्र, मागणी वाढल्याने सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला डझनभर अंड्यांचा दर थेट ६ ते १० रुपयांनी वाढून ९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये तर डझनभर अंड्यांसाठी ग्राहकांना ९४ रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात अंड्यांचा दर डझनमागे ९० रुपये इतका नोंदवला गेला होता. मंगळवारी १०० अंड्यांचा दर ६२० रुपयांवर जाऊन पोहोचला. नोव्हेंबर महिन्यात १०० अंड्यांचा दर ५८०, ऑक्टोबर महिन्यात ५६० आणि ऑगस्ट महिन्यात ४८० रुपये इतका होता. तर सध्या किरकोळ विक्रेत्यांकडून एक डझन अंड्यांसाठी ८४ ते ९० रुपये इतका दर आकारला जात आहे.

अंड्यांच्या भाववाढीसाठी अनेक कारणे आहेत. थंडीचा महिना असल्यामुळे अंड्यांची मागणी वाढली आहे. उत्तर भारतात अंड्यांची मागणी वाढवल्यामुळे हैदराबादमधून त्याठिकाणी पुरवठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईत अंड्यांची टंचाई जाणवत आहे. दक्षिण भारतातील हैदराबाद, कर्नाटक आणि तामिळनाडूतून मुख्यत्वेकरून मुंबईत अंड्यांचा पुरवठा केला जातो. यंदाच्या हंगामात हैदराबादमध्ये अंड्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचवेळी उत्तर भारतातून अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबईत अंड्यांची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे दर वाढले आहेत.

अंड्यांचे दर वाढल्याने गरिबांची अडचण
गरीब कुटुंबांमध्ये आहारातील प्रोटिनचा प्रमुख स्रोत म्हणून अंड्यांकडे पाहिले जाते. मात्र, सध्या अंड्यांचा दर खूपच वाढला आहे. एरवी गरीब वर्गातील लोक ५ रुपयांना मिळणारे एक अंडे आणि दोन पाव खाऊन गुजराण करू शकतात. मात्र, दर वाढल्याने अंडी खाणे त्यांना परवडणारे नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR