मानवत / प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतक-यांना देण्यात येणा-या सुविधेमुळे व दरवर्षी कापूस हंगामात येणा-या कापसाच्या विक्रमी आवकमुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस हब म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध होत असल्याचे प्रतिपादन आ. राजेश विटेकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दि.१२ ऑक्टोबर रोजी कापूस लिलावासाठी उभारण्यात येणा-या टीन शेड कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी शिवेंद्र महाराज होते तर उदघाटक म्हणून आ. विटेकर उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती गंगाधरराव कदम, डॉ अंकुश लाड, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायणराव भिसे, संचालक ज्ञानेश्वर मोरे, जुगलकिशोर काबरा, गजानन घाटूळ, अंबादास तूपसमुंद्रे, सुरज काकडे, रामेश्वर जाधव, बालासाहेब हिंगे, सचिव शिवनारायण सारडा, अडत व्यापारी श्रीकिशन सारडा, जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश कत्रुवार, आडत संघटनेचे अध्यक्ष अश्रुबा कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला टिन शेड कामाचा आ. विटेकर, स्वामी शिवेंद्र महाराज यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आ. विटेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतक-यांना देण्यात येणा-या सेवा सुविधा, खुल्या कापूस लिलावाची पद्धत, शेतक-यांना कापूस विक्री केल्यानंतर तात्काळ पेमेंट केल्या जात असल्याने परभणी, नांदेड, बीड, जालना हिंगोली या पाच जिल्ह्यातून शेतकरी कापूस विक्रीसाठी मानवत बाजार समितीला पसंती देत असल्याने कापूस विक्रीसाठी ही बाजार समिती शेतक-यांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पाच जिल्ह्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत असल्याने विक्रमी आवकचे नोंद होत आहे. पर राज्यातील व्यापा-यांकडून मानवत बाजार समिती अंतर्गत जिनिंग युनिट स्थापन केल्याने मानवत बाजार समितीची कापूस हब म्हणून ओळख निर्माण होत असल्याचे आ. विटेकर यांनी सांगितले. या बाजार समितीला आणखीन नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. विटेकर यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात स्वामी शिवेंद्र महाराज यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीन शेड उभारणीच्या कामाला शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक सभापती पंकज आंबेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन सत्यशील धबडगे तर आभार उपसभापती नारायण भिसे यांनी मानले.
शेतक-यांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून टिन शेड : सभापती आंबेगावकर
कापूस लिलावासाठी मानवत बाजार समितीकडून ४ ओट्यासाठी टीन शेड उभारण्यात आले आहे. यामध्ये शेतक-यांचे २०० वाहने उभी करता येतात. शेतक-यांच्या गाडया उन्हात उभा राहत होत्या. त्यांना उन्हाचा त्रास होवून नये यासाठी बाजार समितीच्या कापूस लिलाव होत असलेल्या उर्वरित मोकळ्या जागेत टीन शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी सांगितले.