वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
प्लास्टिक कच-याचा योग्य रीतीने पुनर्वापर न होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असताना, आता संशोधकांनी एक आशादायक शोध लावला आहे. त्यांनी हवेतील आर्द्रता वापरून प्लास्टिकचे विघटन करण्याची नवी पद्धत विकसित केली आहे.
या पद्धतीत त्यांनी पॉलीएथिलीन टेरेफ्थालेट नावाच्या सर्वसामान्य प्लास्टिकवर एक स्वस्त कॅटलिस्ट लावला आणि त्याला फक्त साध्या हवेत ठेवले. अवघ्या चार तासांत ९४% प्लास्टिक विघटित झाले आणि ते टेरेफ्थालिक आम्लमध्ये रूपांतरित झाले, जे उच्च मूल्य असलेले आणि पॉलीएस्टर तयार करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहे.
या संशोधनाचे सह-लेखक यॉसी क्रॅटिश, नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील रसायनशास्त्रातील संशोधन सहायक प्राध्यापक, म्हणाले, आमच्या संशोधनातील सर्वात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे आम्ही हवेतील नैसर्गिक आर्द्रता वापरून प्लास्टिक मोडले…एक स्वच्छ, निवडक आणि प्रभावी प्रक्रिया. अमेरिका सध्या दरडोई प्लास्टिक प्रदूषणात अव्वल असून, केवळ ५% प्लास्टिकच पुनर्वापरात येते. यामुळेच ही नवी प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
या प्रक्रियेत मोलिब्डेनम कॅटलिस्ट (एक चांदीसारखा, लवचिक धातू) आणि ऍक्टिवेटेड कार्बन यांचा वापर करून प्लास्टिकचे रासायनिक बंध तोडले जातात. या पद्धतीने मिश्र प्लास्टिकांवर प्रयोग केला असता, केवळ पॉलीएस्टर प्लास्टिकवरच परिणाम झाल्याचे आढळले. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक वेगळे करण्याची गरजच उरली नाही.
या यशस्वी प्रयोगानंतर, आता संशोधक हे तंत्र औद्योगिक स्तरावर कसे वापरता येईल, यावर काम करत आहेत. प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी ही पद्धत पर्यावरणस्रेही आणि प्रभावी बदल घडवून आणू शकते, असा विश्वास व्यक्त होत आहे.