जळगाव : पतीला सोडून दोन महिन्यांपासून माहेरी राहत असलेल्या पत्नीचा आणि नऊ महिन्यांच्या मुलीचा निर्घृण खून करत पतीने विहिरीमध्ये उडी मारून स्वत:ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील पोलिस पाटील राजेंद्र इंगळे यांची विवाहित मुलगी प्रतिभा झनके या तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीसह आपल्या माहेरी राहत होत्या. पतीशी पटत नसल्याच्या कारणावरून त्या माहेरी राहत होत्या. या काळात पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला होता.
पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात खदखदत होता. याच रागात पती विशाल झनके हा पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आला होता. यावेळी घरात कोणी नसल्याने या दोघांमध्ये काय वाद झाला हे समजू शकले नाही.
घरातील मंडळी काही वेळानंतर घरात आली. यावेळी त्यांना प्रतिभा झनके आणि तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तर जवळच्या एका विहिरीत पती विशाल झनके याचा मृतदेहही आढळून आल्याने या घटनेत आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.