हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला आयपीएल २०२५ मध्ये सलग चौथा पराभव पत्करावा लागला असून आज झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात गुजरातने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. गुजरातने सलग तिसरा सामना जिंकला असल्याने गुणतालिकेत गुजरातचे स्थान वधारले आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुजरातने १५३ धावांचे लक्ष्य १६.४ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार शुभमन गिलने ६१ धावांची नाबाद खेळी केली. तर शेरफेन रुदरफोर्ड ३५ धावांवर नाबाद राहिला. वॉशिंग्टन सुंदरने ४९ धावा केल्या. मोहम्मद शमीने २ विकेट घेतल्या, तर कर्णधार पॅट कमिन्सने १ विकेट घेतली.
गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने २० षटकांत ८ गडी गमावून १५२ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डी (३१ धावा) आणि हेनरिक क्लासेन (२७ धावा) यांनी एकमेव अर्धशतक भागीदारी केली. मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. दरम्यान गुजरातने सलग तिसरा सामना जिंकला आहे. संघाचे ४ सामन्यांनंतर ६ गुण आहेत. टायटन्स संघ दुस-या स्थानावर आला आहे. हैदराबादने सलग चौथा सामना गमावला आहे. संघाचे ५ सामन्यांनंतर २ गुण आहेत. सनरायझर्स संघ दहाव्या स्थानावर स्थिर आहे.