16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeक्रीडाहैदराबादची त्सुनामी कुलदीपने २६६ धावांवर रोखली

हैदराबादची त्सुनामी कुलदीपने २६६ धावांवर रोखली

दिल्ली : ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांच्या फटकेबाजीने अरुण जेटली मैदान दणाणून सोडले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने ट्वेंटी-२० क्रिकेट इतिहासातील पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या कुटल्या. कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन दिल्ली कॅपिटल्सला सामन्यात पुनरागमन करून दिले, परंतु हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यापासून ते नाही रोखू शकले. आयपीएल इतिहासात तीनवेळा २५० हून अधिक धावा करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला.

खलिल अहमदच्या दुस-या चेंडूपासून त्यांनी षटकारांची आतषबाजी सुरू केली, ती थेट ७ व्या षटकापर्यंत सुरू राहिला. या ७ षटकांत हेडने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हैदराबादने २.४ षटकांत विक्रमी पन्नास धावा केल्या आणि ४.५ षटकांत रेकॉर्ड ब्रेकींग १०० धावा ओलांडल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील पॉवर प्ले मधील सर्वोत्तम कामगिरीही हैदराबादने केली. हेड व शर्मा यांनी १२५ धावा पहिल्या सहा षटकांत उभ्या करून विक्रम नोंदवला. कुलदीप यादवने हे वादळ रोखले आणि अभिषेक १२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह ४६ धावांवर झेलबाद झाला. अक्षर पटेलने अप्रतिम झेल घेतला आणि १३१ धावांची भागीदारी तुटली.

त्याच षटकात कुलदीपने हैदराबादला दुसरा धक्का देताना एडन मार्करम ( १) याला बाद केले. कुलदीपने दिल्लीला दिलासा देणारी विकेट मिळवून दिली. त्याने हेडला बाद केले, ज्याने ३२ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या. अक्षरने १०व्या षटकात हेनरिच क्लासेनचा ( १५) त्रिफळा उडवून दिल्लीला चौथी विकेट मिळवून दिली. धमाकेदार सुरुवातीनंतर हैदराबादने २३ धावांत ४ विकेट्स गमवाल्या आणि त्यातल्या तीन विकेट्स कुलदीपने घेतल्या. या विकेटनंतर हैदराबादच्या धावांची गती काहीशी मंदावली.

नितिश कुमार रेड्डी व शाहबाज अहमद यांनी १४.५ षटकांत संघाच्या दोनशे धावा पूर्ण केल्या. आयपीएल इतिहासातील या चौथ्या वेगवान दोनशे धावा ठरल्या. बंगळूरूने २०१६ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध १४.१ षटकांत द्विशतक झळकावले होते. त्यानंतर पुढील तिन्ही वेगवान द्विशतक हे हैदराबादच्या नावावर आहेत. सेट झाल्यावर या दोन्ही फलंदाजांनीही हात मोकळे केले. कुलदीपने आणखी एक धक्का देताना रेड्डीला ( ३७) झेलबाद केले. त्याने ४ षटकांत ५५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. शाहबादने २९ चेंडूंत नाबाद ५९ धावा चोपल्या संघाला ७ बाद २६६ धावांपर्यंत पोहोचवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR