22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमी एकटाच शंभर आमदारांना पुरेसा

मी एकटाच शंभर आमदारांना पुरेसा

अमरावती : माणसाच्या अंगात किती ताकद आहे यापेक्षा, डाव कसा मारता येईल हे महत्त्वाचे आहे. आमची पार्टी फक्त दोन आमदारांची जरी असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेसा आहे. आम्ही चितपट केल्याशिवाय राहत नाही. मग सभागृहात कोण बसला आहे, कोण नाही बसला आहे याची चिंता आम्ही करत नाही. पण शेतकरी आमचा बाप आहे, हे आमच्या डोकात कायम राहते. आता खरी लढाई ही शेतक-यांसाठी लढली पाहिजे असे अमरावतीच्या एका कार्यक्रमात त्यांनी भाष्य केले आहे.

आज सोयाबीन, कापसाचे भाव पडले आहेत. मात्र तुमचा तिवासा तालुका दुष्काळात आला नाही. सरकार मागून सरकार बदलले, मात्र धोरण काही बदलत नाही. त्यात अगदी कुठलाही पक्ष असू द्या. मग तो भाजप असो, काँग्रेस असो की राष्ट्रवादी, शिवसेना असो. शेतक-याला न्याय मिळावा यासाठी मी कायम सभागृहात बोलत असतो. आज जरी मी शिंदे साहेबांसोबत सत्तेत असलो तरी, शेतक-यांपुढे आम्हाला शिंदे साहेब महत्त्वाचे नाहीत. आम्हाला शेतकरी फार महत्त्वाचा आहे. हे आम्ही विधानसभेत देखील अनेकदा बोलत आलो आहोत. म्हणून आम्ही कायम शेतक-यांसाठी काम करतो. त्यामुळे सत्ता आम्हाला महत्त्वाची नसल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले.

हा तमाम शेतकरी अन् ग्रामीण जनतेचा अपमान
आम्ही जेव्हा ग्रामीण भागातले प्रश्न घेऊन सभागृहात उभे राहतो, त्यावेळी तुमच्या-आमच्यावर कशाप्रकारे अन्याय होतो हे आपण बघितले पाहिजे. केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना शहरातील लोकांना अडीच लाखांचे घर देते. मात्र हीच योजना जेव्हा ग्रामीण भागात येते त्यावेळी तिची किंमत ही अडीच लाखांवरून सव्वा लाखावर येते. विषय केवळ पैशांचा नाही. मात्र, हा तमाम शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

शेतक-यांसाठी एकत्र आले पाहिजे
मी आमदार आहे. मला अडीच लाख रुपये पगार आहे. अधिका-यांना लाख-लाख रुपये पगार असतो. मात्र पाच-पाच एकर शेत असून देखील शेतक-यांना दहा हजार रुपये देखील मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जाती-धर्मासाठी लोक एकत्र येतात, मात्र शेतीसाठी एकत्र येत नाहीत, ही शोकांतिका आहे. आता शेतक-यांसाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन देखील बच्चू कडू यांनी यावेळी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR