भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या भवितव्याबाबत भाजपाने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यांच्यासाठी पक्ष नेमका काय विचार करत आहे, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांनी “मला माजी मुख्यमंत्री म्हटले जाते, पण हे रिजेक्शन नाही. मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही मध्य प्रदेशातील लोक खूप प्रेम करतात असे म्हटले आहे.
पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री शिवराज म्हणाले की, मला आता माजी मुख्यमंत्री म्हटले जाते, परंतु मी रिजेक्टेड मुख्यमंत्री नाही. अनेक वेळा मुख्यमंत्री पद सोडले जाते कारण लोक जास्त काळ सत्तेत राहिल्यास नावे ठेवतात. पण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही आता जिथे जातो तिथे लोक मामा म्हणतात. जनतेचे प्रेम हाच माझा खरा खजिना आहे.
मी कोणत्याही पदासाठी राजकारणात नाही
भाजपाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा अर्थ मी सक्रिय राजकारण सोडेन असा होत नाही. मी कोणत्याही पदासाठी राजकारणात नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारण करत आहे. १९९० मध्ये बुधनी येथून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्यापासून सुरू झालेल्या त्यांच्या निवडणूक कारकिर्दीबद्दल बोलताना, शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय प्रामाणिकपणे निवडणूक लढण्याला दिले.