22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजन‘मी जिवंत आहे..’; निधनाच्या वृत्तानंतर पूनम पांडेची पोस्ट

‘मी जिवंत आहे..’; निधनाच्या वृत्तानंतर पूनम पांडेची पोस्ट

मुंबई : मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली होती. ही माहिती तिच्या व्यवस्थापकाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून दिली होती. पूनमला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्याचे सांगण्यात आले होते. या वृत्ताने पूनम पांडेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

दुसरीकडे, पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर तिचे कुटुंबीय नॉट रिचेबल झाले होते. याच दरम्यान, पूनम पांडेने ‘मी जिवंत आहे’ असे सांगितल्याने तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, ती जिवंत आहे आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हे केले गेले. या कॅन्सरने अनेक लोकांचा बळी घेतला आहे.

पूनम पांडेने गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन निवडला. २ फेब्रुवारी रोजी तिचा कॅन्सरने मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते. तर आता ३ फेब्रुवारीला पूनमची तब्येत बरी असल्याचा खुलासा झाला आहे.

इन्स्टाग्रामवर ‘नशा’ फेम अभिनेत्री पूनम पांडेने म्हटले, ‘तुम्हा सर्वांसोबत काहीतरी महत्त्वपूर्ण शेअर करणे मला भाग पडले, मी येथे आहे, जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर मला झालेला नाही. परंतु दुर्दैवाने, हा आजार कसा टाळायचा? याबद्दल जागृती नसल्याने हजारो महिलांचा यामुळे बळी जात आहे.

इतर काही कॅन्सरप्रमाणेच, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे लवकर तपासणी चाचण्या करणे. या आजारामुळे कोणाचाही जीव जाणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे. गंभीर जनजागृतीने एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला तो कसा टाळता येईल? याची माहिती दिली जाईल याची खात्री करूया. काय करता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या आजाराच्या विनाशकारी प्रभावाचा अंत करण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR