मथुरा : मथुरा येथून तिस-यांदा भाजपा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी यांनी स्वत:ला भगवान श्रीकृष्णाची गोपिका म्हटले आहे. मी नावासाठी किंवा प्रसिद्धीसाठी राजकारणात आलेले नाही. मी कोणत्याही भौतिक फायद्यासाठी राजकारणात आले नाही. भगवान श्रीकृष्ण लोकांवर प्रेम करतात, त्यामुळे त्या सर्व लोकांच्या सेवेत काम केलं तर ते मलाही आपला आशीर्वाद देतील असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
मथुरेतून तिस-यांदा लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहे. जीर्ण झालेल्या ब्रज ८४ कोस परिक्रमाच्या विकासाला आपले प्रथम प्राधान्य असेल, असे त्या म्हणाल्या. मथुरेच्या दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमा मालिनी यांनी ब्रज ८४ कोस परिक्रमा पर्यटकांसाठी आनंददायी आणि आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
यासाठीचा डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) ११,००० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. मी आदर्श पायाभूत सुविधांसाठी मंजूर उर्वरित निधी मिळवून देईन जेणेकरुन यात्रेकरूंना आवश्यक सुविधा मिळतील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक हे आकर्षक आणि मंत्रमुग्ध होईल. पर्यटनामुळे स्थानिकांसाठी रोजगारही वाढेल. यमुना नदीच्या स्वच्छतेला आपले दुसरे प्राधान्य असेल असेही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
नमामि गंगे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच गंगा आणि यमुना नद्यांच्या प्रदूषणाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचा दावा हेमा मालिनी यांनी केला. त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी नमामि गंगे प्रकल्पात रस घेतला तेव्हापासून प्रयागराजमधील गंगेचे पाणी पारदर्शक आणि प्रदूषणमुक्त झाले आहे. पण दिल्ली सरकारने यमुना नदीच्या प्रदूषणाची समस्या सोडवण्यात रस घेतला नाही आणि मथुरेत पवित्र नदी प्रदूषित राहिली. दिल्ली आणि हरियाणातील यमुना स्वच्छ केल्याशिवाय मथुरेत स्वच्छ यमुनेचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही.