नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासात अशा काही कामगिरी आहेत, ज्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने २०२३ च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कहर केला होता. वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना शमीने गाजवला होता. त्या सामन्याचा एक व्हीडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शमी ५ विकेट घेतल्यानंतर मैदानावर बसला होता. तेव्हा पाकिस्तानी लोकांनी सोशल मीडियावर सांगितले होते की, शमी हा भारतीय मुस्लिम आहे, त्याला सजदा करायचा होता, पण तो घाबरला. भारतातील भीतीमुळे तो करू शकला नाही.
यावर एका टीव्ही चॅनलच्या स्पेशल शोमध्ये जेव्हा अँकरने मोहम्मद शमीला याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा शमी म्हणाला की, ‘यार, कुणाला सजदा करायचा असेल तर कोण अडवणार आहे? जर मला ते करायचे असेल तर मी ते करेन. मी मुस्लिम आहे, मी अभिमानाने सांगतो की मी मुस्लिम आहे. मी भारतीय आहे म्हणून मी अभिमानाने सांगतो की होय मी भारतीय आहे. मला काही अडचण आली असेल तर मी भारतात राहत नसतो. मला सजदा करण्यासाठी कोणाची परवानगी लागली तर मी इथे का थांबू?’
स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुढे म्हणाला की, मी इन्स्टाग्रामवर त्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. मी यापूर्वीही ५ विकेट घेतल्या आहेत. पण कधी सजदा केला नाही. मग त्या दिवशी का करू. आणि अजून एक की मी भारतातील प्रत्येक व्यासपीठावर सजदा करू शकतो. मला कोणीही प्रश्न विचारा मग… हे लोक फक्त त्रास देतात.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात शमी पहिल्या ४ सामन्यांत खेळू शकला नाही. यानंतर त्याला संधी मिळाल्यावर त्याने स्पर्धेतील उर्वरित ७ सामन्यांमध्ये धुमाकूळ घातला. या सात सामन्यांमध्ये त्याने २४ विकेट्स घेऊन, केवळ स्पर्धेतील यशस्वी गोलंदाजच नाही तर वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वांत यशस्वी गोलंदाज बनला.