नेवासा : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार शंकरराव गडाख यांनी महायुती सरकारवर टीका करत स्वाभिमानी महाविकास आघाडी सरकार राज्यात आणण्याचा निर्धार मेळावा नेवासात घेतला.
शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करत, त्यांनीच मंत्रिपदावर संधी दिली. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच असून उद्धवसाहेबांबरोबरच राहणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील राज्यातील जनता महाविकास आघाडीलाच कौल देईल, असा विश्वास शंकरराव गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नेवासा येथे निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्याला उत्स्फूर्त गर्दी होती. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी हे लोक येथे जमली असून आता राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतक-यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळणार, असा दावा शंकरराव गडाख यांनी यावेळी केला.
शंकरराव गडाख यांनी यावेळी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकार घालवल्यानंतर राज्यात आलेल्या महायुती सरकारने महाविकास आघाडीमधील आमदारांची अडवणूक केली. सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली. महायुती सरकारच्या कावेबाजपणाचा धांडोळाच यावेळी शंकरराव गडाख यांनी मांडला. परंतु आता आपले जनतेचे महाविकास आघाडी सरकार येणार असून जनतेने आणि शेतक-यांनी ठामपणे पाठीशी उभे राहावे, असे आवाहन शंकरराव गडाख यांनी यावेळी केले.
आत्तापेक्षा डबल कामं करणार
महाविकास आघाडीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असून जनतेने पुन्हा संधी दिल्यास आत्तापेक्षा डबल कामं करू. माझ्याबद्दल नेवासा तालुका मतदारसंघांमध्ये काहीजण विशेष करून विरोधक गैरसमज पसरविणा-याचा धंदा करत आहेत. या विरोधकांपासून सावध राहा. महाविकास आघाडीच्या छताखाली सर्वजण एकत्र येत आहेत.