सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊसदरावरून आक्रमक झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार. राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. लवकरात लवकर ऊसदराचा तिढा सोडवावा. जर तसा निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली आहे.
जयंत पाटील यांचं नाव घेण्याची वाईट वेळ माझ्यावर अजून आलेली नाही. आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे जयंत पाटील यांनी बघावं. आम्ही राज्यातील शेतक-यांसाठी लढतोय. त्यांच्यासाठी टाहो फोडतोय, असे म्हणत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊस दरावरून आक्रमक झाले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसोबत वसंतदादा साखर कारखानाप्रणीत दत्त इंडिया येथे जात ते काटा बंद आंदोलन करत आहेत. सध्या या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. इथे टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.