छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो, असे विधान अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. ते सध्या सिल्लोड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजिंठा येथे झालेल्या सभेत जर मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक माझे काय करणार, असा रोखठोक सवाल अब्दुल सत्तार यांनी केला. या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. राज्यात जे मोठे पाच नेते आहेत, त्यात माझे नाव आहे, यावरूनही काही जण माझा व्देष करीत असतात, असे सत्तार म्हणाले.
जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ अशी ओळख आहे. विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार हे या मतदारसंघातून पुन्हा रिंगणात आहेत. अब्दुल सत्तार यांनी तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता त्यांना चौथ्यांदा आमदार व्हायचंय! त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे.
गेली विधानसभा निवडणूक (२०१९)अब्दुल सत्तार यांनी शिवसनेच्या तिकिटावर लढवली होती.काँग्रेसचे माणिकराव पलोडकर हे त्यांच्या विरोधात होते. निवडणुकीत सत्तार विजयी झाले होते.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आपलाच विजय होईल, असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांना आहे. या मतदारसंघातील लढतीवरून दोन कार्यकर्त्यांमध्ये पैज लागली आहे. ५०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून ही पैज लावण्यात आली आहे. निवडणूक मताधिक्यावरून (लीडवरून) ही शर्यत लावण्यात आली आहे.