नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होईल, तर ८ फेब्रुवारीला निकाल लागेल. दरम्यान, आजच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री आतिशी मार्लेन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरादर निशाणा साधला. भाजपने मुख्यमंत्री निवासस्थानातून बाहेर काढल्याचा आरोप आतिशी यांनी यावेळी केला आहे.
सीएम आतिशी म्हणाल्या की, आज दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या घोषणेच्या आदल्या रात्री माझे अधिकृत निवासस्थान हिरावून घेतले. पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे वाटप रद्द करण्यात आले आहे. निवडून आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काढून घेतले जाते. तीन महिन्यांपूर्वीही त्यांनी असेच केले होते. तीन महिन्यांत दुस-यांदा मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हाकलून देण्यात आले.
मी दिल्लीतील लोकांच्या घरी राहीन
भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री आतिशी पुढे म्हणाल्या, ते आमची घरे हिसकावून घेऊ शकतात, पण दिल्लीतील लोकांसाठी काम करण्याची आमची इच्छाशक्ती हिरावून घेऊ शकत नाहीत. गरज पडली तर मी दिल्लीतील लोकांच्या घरात राहीन, पण काम थांबवणार नाही. आज त्यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून हाकलून दिले, मी शपथ घेत आहे की, दिल्लीतील प्रत्येक महिलेला २१०० रुपये मिळवून देईन, संजीवनी योजनेंतर्गत प्रत्येक वृद्ध व्यक्तीला १८,००० रुपये दरमहा मोफत उपचार देईन.